नोकरी करू की व्यवसाय?
नोकरी करू की व्यवसाय?
गेल्या काही महिन्यात आम्हाला भेटायला आलेल्या लोकांमध्ये एक गोष्ट ठळकपणे जाणवायला लागली आहे. जवळजवळ प्रत्येकालाच कधीनाकधी तरी नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरु करायची इच्छा किंवा स्वप्न आहे. त्यांच्या भविष्यातील उद्दिष्टांच्या यादीत 'व्यवसाय सुरु करण्यासाठी रकमेची तजवीज' ही एक नोंद असते. आणि पंचविशीच्या वयोगटातील लोकांपासून पंचेचाळीशी पार केलेल्या - नोकरीत १८-२० वर्षे अनुभव घेतलेल्या - सर्व वयोगटातील लोकांमध्ये स्वतःचा स्वतः व्यवसाय किंवा उद्योग सुरु करण्याची मनीषा वाढू लागल्याचं जाणवतंय. आंत्रप्रेन्योर बनण्याचे वाढते प्रमाण आणि समाजाचा त्याविषयीचा बदलता दृष्टिकोन हे आपल्या देशाला, समाजाला आणि अर्थव्यवस्थेला नक्कीच लाभदायक आहेत. वैयक्तिक पातळीवर देखील आजच्या जमान्यात नोकरीच्या ठिकाणी वाढती अनिश्चितता लक्षात घेता स्वतःचा मार्ग स्वतः आखण्याच्या पर्यायाचा प्रत्येकालाच विचार करणे गरजेचे झाले आहे.
मात्र काहींच्या बाबतीत अशी नोकरी सोडायची योजनेची प्रेरणा मीडियामध्ये किंवा समाजमाध्यमात फिरणाऱ्या यशस्वी व्यावसायिकांच्या अद्भुतरम्य यशोगाथा तर नाही ना अशी शंका येते. मी स्वतः गेली आठ वर्षे व्यवसाय चालवत असल्याने एक प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे अशा यशोगाथा बऱ्याचदा आपल्याला त्यांनी घेतलेल्या कष्टांचे, ओलांडलेल्या अडथळ्यांचे पूर्ण आकलन करून देत नाहीत. त्यामुळे अनेकांचा व्यवसाय म्हणजे 'कमी कष्टात जास्त कमाई' असा सोयीस्कर समज होण्याची शक्यता असते. त्यातून पडणाऱ्या स्वप्नांमुळे आपली नोकरी नीरस किंवा कंटाळवाणी वाटू लागते आणि 'कधी एकदा या जोखडापासून मुक्त होतो' असे विचार घोळू लागतात. मात्र योग्य आर्थिक आणि इतर तयारीविना नोकरी सोडून व्यवसायात उतरणे हे पाण्याच्या खोलीचा अंदाज न घेता मारलेल्या उडीप्रमाणे धोक्याचे ठरू शकते.
वास्तविक व्यवसाय चालवणं हे एक जिकिरीचं आणि कटकटीचं काम आहे. यात पडल्यावर 'कामाचा वेळ' आणि 'कौटुंबिक वेळ' यात फरक करता येत नाही. रात्री घरी स्वयंपाक करताना देखील मी कुठल्या क्लाएंटला काय काय माहिती पाठवायची आहे, उद्या कुठल्या मिटींग्स आहेत, कोणाची काय कागदपत्रांची पूर्तता करायची आहे, कोणाकडून कसली माहिती मागवायची आहे, नवीन काय शिकायचं आहे अशा असंख्य विचारांमध्ये गुंतलेली असते. हाताखालच्या लोकांना शिकवणे ही देखील आपलीच जबाबदारी असते. एका बाजूला सगळे क्लाएंट्स आणि दुसरीकडे सर्व्हिस देणाऱ्या सगळ्या कंपन्या या सगळ्यांना तोंड देखील आपल्यालाच द्यावे लागते. प्रिंटरची शाई संपली, इलेक्ट्रिसिटी गेली, टेबलच्या ड्रॉवरची चावी हरवली, पाणी सांडले अशा कुठल्याही संकटात आपल्यालाच धावपळ करायची असते. प्रेझेंटेशन बनवण्यापासून ते आपले इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यापर्यंत सर्व प्रकारची कामं करताना अनेकविध भूमिका निभवाव्या लागतात. चालू असलेली नोकरी सोडून व्यवसायात पडताना अशा गोष्टींची मानसिक तयारी फार महत्त्वाची आहे.
मात्र या सोबत नोकरी सोडताना आपण अजून एका गोष्टीवर पाणी सोडत असतो, ती म्हणजे दरमहा मिळणारा पगार. बऱ्याचदा आपण नियमित आणि खात्रीशीर मिळणाऱ्या या रकमेचा फायदा नीटसा विचारात घेत नाही. ही भविष्यातील खात्रीशीर आवक आपल्याला सर्व मासिक खर्च भागवण्याची मोठी मनःशांती तर देतेच, शिवाय गृह, वाहन वा वैयक्तिक अशा अनेक प्रकारच्या कर्ज मिळवण्यासाठी पात्र बनवते. या उलट व्यावसायिकाला त्याच्या उद्योगातून वेळच्यावेळी पैसे मिळतील याची शाश्वती नसते. कागदावरील नफा आणि नगदी नफा यात नेहेमीच फरक असतो आणि 'कॅशफ्लो' चे व्यवस्थापन हा प्रत्येक व्यावसायिकाच्या डोक्याचा सर्वात मोठा ताप असतो. तुम्ही कुणाही क्लाएंटचे कितीही मोठे आणि महत्त्वाचे काम रक्त आटवून वेळेत करून दाखवलेत तरी त्याचा मोबदला मिळण्यास वेळ जाणार असतो.
हे सगळे सांगण्याचा उद्देश कोणाला आंत्रप्रेन्योर बनण्यापासून परावृत्त करण्याचा नाहीये. पण केवळ नोकरीचा कंटाळा आलाय म्हणून व्यवसाय करूया असा विचार करणाऱ्या हौश्या व्यावसायिकांना सावध करण्याचा आहे की व्यवसायात नोकरीपेक्षा कष्ट जास्त आणि त्यांचं चीज होण्याची खात्री कमी आहे. झोकून काम करण्याची आणि दीर्घकाळ संयमानं व चिकाटीने ते करत राहण्याची तयारी इथे फार गरजेची आहे. व्यवसायाला सुरुवात केल्यापासून नियमित नफा कमवायला ३-४ वर्षेही सहज जाऊ शकतात याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे.
त्यामुळे नोकरी सोडून व्यावसायिक बनताना पुढील काही गोष्टी आपण अवलंबण्याचा प्रयत्न केला पाहिजे:
१. हा निर्णय कधीच भावनेच्या आहारी जाऊन घेऊ नये. 'कंटाळा आला' किंवा 'वरिष्ठांशी मतभेद झाले' अशा कारणांनी निर्णय घेणे टाळावे.
२. अशा प्रसंगासाठीची आर्थिक तरतूद जितकी आधीपासून आणि जितकी जास्त करता येईल तितकी करावी. किमान २ वर्षे व्यवसायातून नफा मिळाला नाही तरीही सर्व कौटुंबिक खर्च व्यवस्थित भागतील एवढा निधी जमा करावा.
३. व्यवसायाची गरज लक्षात घेऊन त्यात गुंतवण्यासाठी निधीचे वेगळे नियोजन करावे.
४. मोठी कर्जे डोक्यावर असताना असे निर्णय टाळावेत.
५. शक्य असेल तेव्हा नोकरी सुरु असतानाच फावल्या वेळाचा उपयोग व्यवसायबांधणीसाठी करावा. त्यातून अनुभववृद्धीही होते आणि नोकरी सोडेपर्यंत व्यवसायाचा पाया पक्का झालेला असतो.
६. व्यवसायासाठी निवडलेल्या क्षेत्राचा सूक्ष्म अभ्यास करावा, आपला ग्राहकवर्ग, आपण देऊ शकणाऱ्या सुविधा, त्यातून मिळू शकणारे उत्पन्न यांचा आराखडा बनवावा म्हणजे वाढीच्या संधी शोधणे सोपे जाते.
७. आपल्या क्षेत्रातील एखाद्या अनुभवी व्यक्तीकडून नियमित वैयक्तिक मार्गदर्शन मिळवण्यासाठी प्रयत्न करावा.
आपले नोकरी मधून व्यवसायात जाणे हा आर्थिकदृष्ट्या संपूर्ण कुटुंबासाठी एक मोठा निर्णय असतो, आणि घरातल्या प्रत्येकाच्याच जीवनशैलीत त्यामुळे बदल होणार असतात. त्यामुळे तो व्यवस्थित योजनाबद्ध रीतीने अंमलात आणणं गरजेचं असतं. आपली नोकरी फारच कंटाळवाणी किंवा एकसुरी होतेय असे जर वाटायला लागलं तर स्वतःला रिफ्रेश करण्यासाठी एखादी लांबलचक सुट्टी देखील पुरेशी ठरू शकते, बरोबर की नाही?
---- प्राजक्ता कशेळकर